Header Ads Widget

'आत्मा'सन्मान की 'आत्मा'पमान?


 आत्मासन्मान की 'आत्मा'पमान?

#atma#lok-sabha-election-2024-#uddhav-thackeray-#narendra-modi#Sharad pawar

राजकारणात आत्मसन्मान हा शब्द लुप्त झालाय. मात्र आता 'आत्मा' शब्दावरून राजकारण पेटलंय. शरीरातून आत्मा निघून गेला की उरते ती फक्त'बॉडी'. राजकारणातला आत्मा तर केव्हाच निघून गेलाय. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आत्मा चर्चेला आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी आत्मा या शब्दांवरून सामना रंगवलाय. याच पार्श्वभूमीवर 'कट्टाबिट्टा'वर 'आत्मा'निर्भर चर्चा रंगली. या चर्चेला पिंपळ साक्षीला राहिला. 

कधी नव्हे, पण आज सत्या कडवटे पिंपळपारावर सर्वात आधी पोहोचला होता. सत्या तसा परखड बोलणारा. गरमी वाढली असली तरी पिंपळपाराखाली चांगली हवा येत होती. सत्या हाशहुश करत बसता झाला. इतक्यात नेहा नटेव नेहमीप्रमाणे घाईघाईत रस्त्याने चालली होती. सत्याने नेहा घाईने जात असताना पाहिलं आणि तिला हाक मारली...

सत्या कडवटे - अगं ए नेहा...कुठे धावत धावत चाललीय...भटक्या आत्म्यासारखी. इकडे ये पारावर चर्चा करुया... 

पत्रकार नेहा नटवे बूम सावरत आली आणि सत्याच्या समोर बसली...बसता बसता नेहा नटवेनं सत्याला ताडलं.

नेहा नटवे - ए काय रे. मला काय आत्म्याची उपमा देतोयस. अरे, मी अजून जिवंत आहे...आणि माझा आत्मा माझ्या शरीरात आहे. तू वखवखलेल्या आत्म्यासारखा बोलू नकोस...

सत्या कडवटे - अगं, तुझं काम भटक्या आत्म्यासारखचं आहे ना. तुझा आत्मा फक्त दिवसा भटकतो. आता काय राजकीय नेत्यांच्या रॅलीफॅली सुरू आहेतच ना...सकाळी इकडे, दुपारी तिकडे, संध्याकाळी आणकी कुठे...बातमीसाठी तुझा आत्मा फिरतच असतो ना...

नेहा नटवे- असू दे... असू दे...आजकाल आमचा आत्मा बातमीत तसा कमीच असतो.

इतक्यात राजकारणी रोहित राजे घामाघूम होत आले आणि मोठ्या रुमालाने घाम फुसत बसते झाले. ते मांडी घालणार तेवढ्यात नेहाने त्यांच्यासमोर हात पुढे केला आणि...

नेहा नटवे - अहो रोहित राजे, तुम्ही असे घामाघूम कशाने झालात? दिवसाढवळ्या कुणाचा आत्मा दिसला का? आता तुमच्या प्रचारात म्हणे आत्मनिर्भरपेक्षा 'आत्म्या'वर जास्त चर्चा होतेय. 

रोहित राजे- नेहा, आधी तो हात बाजू कर. तुझ्या हातात बूम नाही फणी आहे ती...सरकव बाजूला...

नेहा नटवे - आयला, बूमची फणी कशी झाली. कुणाचा आत्माबित्मा आला की काय? अहो  रोहित राजे, तुम्ही कुणाच्या आत्म्याला घेऊन नाही आलात ना. भटकलेला, वखवखलेला...

रोहित राजे - आधी तुझं तोंड आवर, नाहीतर तोंडातून आत्मा निघून जायचा...आतापर्यंत ईडी, सीबीआय, पोलीस मागे लागत होती आता आत्मापण मागे लागणार वाटतो. मला काय सूचत नाही. 

सत्या कडवेट - तुम्हाला कशाला सुचायला पाहिजे. आत्मा होतो कुणाचा? आत्मा भटकत असतो केव्हा? काय उपरोधिक बोलणं म्हणेज फॅशन झालीय राजकीय नेत्यांची. राजकीय प्रचारात आता शब्दांनाही 'आचारसंहिता' लावायची वेळ आलीय. जरा टी. एन. शेषण यांच्या आत्म्याशी संवाद साधावा लागणार बहुतेक...

इतक्यात आदित्य विचारे पिंपळपारावर डेरेदाखल झाले. 

आदित्य विचारे - काय रे सत्या, कुणाच्या आत्म्याशी संवाद साधायचा विचार करतोस, टी. एन. शेषण यांच्या. अरे त्यांचाही आत्मा हळहळत असेल रे. रोहित राजे, अहो तुमच्या या राजकारणात काय चाललंय काय? चार दिवसांपूर्वीच तुम्हीच सांगितलं ना राजकीय प्रवचनात आत्मा अमर आहे म्हणून. मग जिवंतपणी आत्म्यांना खाली कशाला बोलावता. ते येतात ना सर्वपित्री आमावस्येला. इतक्यात सत्या बोलला...

सत्या कडवटे - विचारे, या राजकारण्यांना कसली आलीय अमावस्या आणि पौर्णिमा. आत्मनिर्भर बना म्हणून नारा द्यायचा आणि  आत्मसन्मान शब्दाचा आपल्याला 'हवा तेवढा'च सन्मान करायचा...बाकी देशात जे काय सुरू आहे ते आत्मसन्मानाने सांगण्यासारखं नाही आणि ते जोराने सांगायला गेलो की आमचा केव्हा आत्मा काढला जाईल, याचा आत्म्यालाही थांगपत्ता लागणार नाही

नेहा नटवे  - माणसांनी आत्मनिर्भर बनलं पाहिजे. आत्मविश्वासाने कार्य केले पाहिजे. स्वत:वर, स्वत:च्या कामावर, कर्तृत्वावर विश्वास असला की दुसऱ्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्याची वेळ येत नाही. मी काय म्हणते रोहित राजे, तुम्ही संध्याकाळी आमच्या चॅनलवर या ना डिबेट करायला. अर्धा तासाचा शोच करू 'आत्मा की खात्मा' असं काहीसं नाव देऊ. चांगला टीआरपी येईल म्हणते. नाय म्हणजे पाहिजे तर त्याचं अँकरिंगही मीच करते. अगदी 'आत्मा'विश्वासाने...नेहा नटवेनं मान झटकली तसं केसातील पिन पाराच्या खाली जाऊन पडला...नेहा पुन्हा बोलायला तोंड उघडणार तोच आदित्य विचारे बोलते झाले

आदित्य विचारे - नटवे, 'आत्मा'विश्वास नाय गो...आत्मविश्वास...तू तर आजकाल 'आत्मा'विश्वास सॉरी आत्मविश्वास गमावल्यासारखी बातम्या देतेस. तुझं जाऊ दे गं. पण या रोहित राजेंना काय झालंय तेच कळत नाही. रोहित राजे, तुम्ही भाषणा करता ती ठरवूनबिरवून करता की मनाला येतं ते बोलता. स्वत:ला मान नाही याचा अर्थ दुसऱ्याला मान नाही असं तुम्हीच कसं काय ठरवता? राजकारणात काय पातळीबितळी ठेवली नाही वाटतं तुम्ही? 

इतक्यात रोहित राजे बोलले.

रोहित राजे - मी काय म्हणतो, हे राजकारण आहे. जसा प्रेमात सर्व काही माफबिफ असताना तसं राजकारणात आहे. आमच्या राजकारण्यांच्या इच्छा,आकांशा काही पूर्ण होत नाहीत. दर पाच वर्षांनी नव्याने जाग्या होत्यात. कितीही खाऊनपिऊन झालं तरी तृप्तीचा, समाधानाचा ढेकर काय तो येतच नाही. उलट किती खावं आणि किती नको असं होऊन जातं. मग असं झालं की नटवेसारखे बोंबलायला मोकळे असतात. देश ओरबाडून खाल्ला म्हणून...

सत्या - अहो रोहित राजे. म्हणून काय झालं. तुम्ही आत्म्यालाही सोडत नाही. त्याला नावं ठेवता. कुणी म्हणतं भटका आत्मा, कुणी म्हणतं वखवखलेला आत्मा, कुणी म्हणतं अतृप्त आत्मा...काय चाललंय काय? मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखं आहे, असं नाही का वाटत तुम्हाला?  समजा, उद्या अर्थखातं सांभाळणारा नेता गेला तर मग काय 'पैशां'साठी त्याचा आत्मा भटकतोय असं म्हणणार का? 

नेहा नटवे - नाही तर काय. एका राजकारण्याने आत्मा काढला की दुसऱ्या नेत्याचा 'आत्मा'सन्मान जागा होतो. म्हणजे काही वर्षांपासून देशभरात सरकारे पडत आहेत, उभी राहात आहेत, पाडली जात आहेत...ते सर्व 'सर्व भटके राजकीय आत्मे' करत असावेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये...

आदित्य विचारे - नेहा, आता कशी तू करेक्ट बोललील. आणि हो, आत्मा शब्दाचा आता करेक्ट कार्यक्रम करायला कुणी मागेपुढे पाहात नाहीत. त्यातच राजकीय साटंलोटं गाठीत बांधून झाल्याने आत्म्याबद्दल बोलायलाही टाळणारे आहेतच की...अरे निदान बोलण्याइतका तरी 'आत्मा'विश्वास ठेवा रे. रोहित राजे, राजकारण एवढं का मिंधं झालंय? आता कुणी कुणावर काय टीका करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे म्हणून हात वर करणं शोभतं का तुम्हाला ते सांगा? आदित्य विचारे आणि सत्याच्या टीकेमुळे रोहित राजे नरमले, मात्र तरीही ते टांग उपर असे बोलू लागले.

रोहित राजे - आत्मा शब्द कुणाला उद्देशून वापरला, का वापरला गेला, त्यामागणं कारण काय, त्यामागचं धोरण काय, त्यामागचं गणित काय हे शोधण्यासाठी मी ईडी आणि सीबीआयला कामाला लावणार आहे. यात नक्कीच यश येईल. जे 'आत्मा'सन्मान विसरले आहेत ते नक्कीच आमच्या आत्म्यात येतील. याची मी तुम्हाला खात्री देतो. कारण पुढची पाच वर्ष मी भटक्या, अतृप्त, वखवखलेल्या, शिकारी आत्म्यांबाबत संशोधन करणार आहे. तेव्हा मला वाटतं तुम्ही आता 'आत्मा'चिंतनाची बैठक संपवायला हवी.

आतापर्यंत आत्माचिंतनाची सुरु असलेली बैठक सदा सर्वसामान्य शांतपणे ऐकत होते. सर्व ऐकूण झाल्यावर ते बोलते झाले. 

सदा सर्वसामान्ये - काही दिवसांनी नेते एकत्र आले की लोक म्हणतील दोन आत्मे पुन्हा मिळाले, मात्र वाढलेली बेकारी, डोईजड झालेली महागाई यामुळे सर्वसामान्य रोजच मरतोय. त्यांच्या आत्म्यालाही नाव द्यायला हे राजकारणी मागे-पुढे पाहणार नाहीत...शेवटी सत्ता महत्त्वाची, आत्मा नाही....महाराष्ट्र अतृप्त आत्म्याचा शिकार झालाय, की जिवंतपणी कुडीत असलेल्या आत्म्यांनी अभिमानी आणि स्वाभिमानी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचा आत्मा काढलाय, हे जनतेला माहीत आहे, मात्र जिथे 'वोट'चं विकलं जाणार असेल तर ते 'बोट' क्रांती घडवणार नाही आणि आत्माही तृप्त होणार नाही. असं सदा सामान्ये बोलले आणि पिंपळपारावरून घराकडे निघाले. 


Post a Comment

0 Comments