Header Ads Widget

खंदे सहकारी, कट्टर विरोधक

 


खंदे सहकारी, कट्टर विरोधक

#SHIVSENA #EKNATH SHINDE #UDDHAVTHACKERYA#LOKSABHA ELECTION

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक भाजपा, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि छोट्यामोठ्या पक्षांमध्ये होणार आहे, मात्र या लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर आयाराम-गयारामच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलीच आहे, मात्र त्या त्या नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलीय. कोण बाजी मारेल हे जूनला ठरेल, मात्र कट्टाबिट्टावर जरा वेगळीच चर्चा रंगलीय.
पिंपळपारावर राजकीय पुढारी रोहित राजे आज लवकरच आले होते. एरवी कार्यकर्ते लवकर येतात आणि नेते उशिरा येतात. काय करणार ही परंपराच आहे. ती जपायलाच हवी. रोहित राजे पिंपळपारावर विराजमान झाले आणि इकडेतिकडे बघू लागले. इतक्यात आदित्य विचारे घाईघाईने जाताना दिसले. त्यांनी आदित्य विचारेंना हाक मारली.
रोहित राजे - अहो आदित्य विचारे, कुठे घाईघाईने निघालेत. या जरा, गप्पा मारूया. आपलाच पिंपळपार आणि आपलीच पकपक.
आदित्य विचारे- उशिरा येणारे नेते आज लवकर कसे काय आले, नाही म्हटलं राजकीय नेत्यांच्या सभांना लोक आणि कार्यकर्ते चार-चार तास बसून असतात आणि नेता येऊन फक्त चार मिनिटं बोलतो.

रोहित राजे - ते चालायचंच. जोपर्यंत जनता येते तोपर्यंत विचारधन पाजळायचं.
इतक्यात सत्या कडवटे पिंपळपारावर बसता झाला आणि बोलताही झाला.
https://whatsapp.com/channel/0029VaSXeTQ6mYPRtx27Ko3u
सत्या कडवटे - तुम्हा राजकारण्यांना ती सवयच आहे. अर्धा दिवस लोकांना बोलवायचं आणि अर्धा तास भूमिकेच्या नावाखाली भाषण ठोकायचं. रोहित राजे आजकाल तुम्ही राजकारणी ना भूमिका नाही मांडत विरोधकांवर निशाणा साधता, मग विरोधक दुसऱ्या सभेत तुमच्यावर तीर मारतो. ती राजकीय भूमिकाबिमिका जी काय म्हणता ना ती काय भाषणात दिसत नाही.
सत्या बोलत असतानाच नेहमीप्रमाणे धावतधावत पत्रकार नेहा नटवे पोहोचली. एका हातात बूम होताच, दुसऱ्या हाताने घाम फुसला आणि लगेच रोहित राजेच्या तोंडावर बूम टाकला.
नेहा नटवे - रोहित राजे, बोला आज काय नवीन विषय आहे. जनतेला कळायला हवा. बोला बोला. आज काय बिनशर्त पाठिंब्यावर बोलणार आहात का? काका-पुतण्या, नणंद भावजय, दादा-वहिनी, भाऊ-भाऊ, काका-मामा या विषयांवर चर्चा करणार आहात का? सांगा लवकर, लाईव्हच करून टाकूया.

रोहित राजे - अगं नेहा, आधी श्वास तरी घे. बुम एवढा पुढे आणलास की माझ्या तोंडात जायचा बाकी राहिला होता. तुम्हा पत्रकारांची घाईच लय भारी...मग घाईघाईत काय तरी कापता आणि काय तरी दाखवता...
इतक्यात आदित्य विचारे मधेच बोलले.

आदित्य विचारे – नेहा, तू आधी गप्प बस बघू. टीआरपी नंतर बघू आणि हे रोहित राजे काय म्हणतात ते तर ऐकूया.

सत्या कडवटे - रोहित राजे काय  बोलणार? आज इकडे प्रचार केला, तिकडे प्रचार केला, यांनी टीका केली, त्यांनी टीका केली. ह्यांव झाला आणि त्यांव झाला.
नेहा नटवे – सत्या, हे तर आम्ही दाखवतो. टीका-ठोमणे, उत्तर-प्रत्युत्तर, टोला-निशाणा...यात आमची स्पेशालिटी आहे.

रोहित राजे - तुम्ही तुमचा थांबवा, या लोकसभा निवडणुकीत लयच रंगत येणार आहे. पक्ष तर लढतीलच, मात्र एकाच पक्षातले दुसऱ्या पक्षात गेलेले आमनेसामने आले आहेत.

आदित्य विचारे- रोहित राजे, तुम्ही काय ते स्पष्ट बोला. कोड्यात बोलू नका. तुमच्यावर काय ईडीबिडीची धाड पडणार आहे का? मग काय ते सरळ सांगून टाका.

सत्या - सरळच सांगा. तुम्हाला निवडणुकीत पाडायचं की नाही पाडायचं ?
रोहित राजे - या लोकसभा निवडणुकीत काही वर्षांपूर्वी एकमेकांच्या खांद्याला खांदे लावून लढणारे आता आमनेसामने आले आहेत. एक तीर मारणार आणि दुसरा निशाणा साधणार.

आदित्य विचारे- म्हणजे कोण कोणाविरोधात लढणार ते सांगायचं आहे का तुम्हाला?

नेहा नटवे- आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. सर्व महाराष्ट्राने ऐकावी आणि आमच्याच चॅनेलवर पहिल्यादा एक्स्लुझिव्ह...खंद्या समर्थकांचा महामुकाबला, लोकसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? कुणाची होणार हार आणि कुणाची होणार जीत? कुणाची होणार सरशी आणि कुणाला लागणार मिरची?

सत्या - नेहा थांबव, थांबव. तू यमकबिमक लाव नको. सरशी-मिरची म्हणता म्हणता तुझी खुर्ची जायची....तुझा बुम रोहित राजेंच्या तोंडाजवळ नाही तर आकाशाकडे हा तो बघ आधी...
इतक्यात आदित्य विचारे बोलते झाले

आदित्य विचारे – नेहा, थोडा वेळ थांब. नंतर काय 24 तास पकपक करायची तर कर...हा तर रोहित राजे तुम्ही काय म्हणता ते आता बोला....

रोहित राजे - ही लोकसभा निवडणूक ना युनिक होणार आहे. आता हेच बघा ना मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. एकेकाळी एकाच शिवसेनेत असलेले हे दोन नेते आता शिवसेना फुटल्यावर एकमेकांविरोधात लढणार आहेत.

आदित्य विचारे - लढू द्या. त्याने काय फरक पडता. मी काय म्हणतो एकाच शिवसेनेत असते तर एकालाच संधी मिळाली असती ना. आता दोन शिवसेना झाल्या त्यामुळे दोघांना संधी मिळाली. आता कुणाला पाडायचं आणि कुणाला जिंकवायचं हे दक्षिण मध्य मुंबईकरांच्या हातात आहे ना. तुम्ही कशाला टेन्शन घेता?

सत्या - पडला तरी शिवसेनेचाच आणि जिंकला तरी शिवसेनेचाच उमेदवार ना.
नेहा नटवे - मग भाजपाचा काय...बघत राहणार. कुठलाही पडेना...इतक्यात आदित्य विचारे बोलले.

आदित्य विचारे - नटवे तू पत्रकार ना, मग नटीसारखी भूमिका नको बदलू. तू तटस्थ असायला हवीस...

सत्या - जाऊदे हो विचारे, ती आपलीच हा...

रोहित राजे - आणि त्या कोकणात....म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत तर विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात म्हणे लढत रंगणार आहे. आता राणे हे भाजपावासीय असले तरी पूर्वीचे कट्टर शिवसैनिकच की. शिवसेना शब्द म्हटल्याशिवाय त्यांचा भाषण पूर्ण होत नाही.  

नेहा नटवे - अहो रोहित राजे, राणे जिंको ती राऊत जिंको...आमच्या त्या गोवा हायवेचा कायता बघूस सांगा. नाही तर पुढच्या गणपतीससुद्धा धक्के खात प्रवास करू लागता. लय आपटता ना. यांना काय दिसूक नाय...

आदित्या विचारे - राज्यात अनेक ठिकाणी असा सामना बघायला मिळणार आहे का रोहित राजे?

रोहित राजे - म्हणजे का विचारता विचारे...अनेक लढती या शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांमध्येच रंगणार आहेत. पालघरमध्ये राजेंद्र गावित आणि भारती कामडी यांचा मुकाबला रंगणार आहे. तर बुलडाण्यात शिंदेंचे प्रतापराव जाधव आणि ठाकरेंचे नरेंद्र खेडेकर उभे ठाकले आहेत आणि त्या मावळात म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे संजोग वाघेरे पाटील आणि शिंदेंचे श्रीरंग बारणे यांच्यात सामना होणार आहे. सामना कोण जिंकणार, हे सामनात आल्यावर कळेलच म्हणा, पण लढत रंगतदार होणार एवढं नक्की.

सत्या - विचारे एवढंच नव्हे तर आपल्या कल्याणमध्ये जनता कुणाचं कल्याण करणार हे समजत नाही. कल्याण लोकलमध्ये जागा पकडण्यावरून जेवढे वाद होत नाहीत तेवढे वाद आणि चर्चा होत नाहीत ना तेवढ्या चर्चा कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कुणाचा देणार यावरून झाल्या. या ठिकाणी तर शिंदेंचे श्रीकांत शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांच्यात हायव्होल्टेज मुकाबला होणार आहे म्हणतात. श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलीय.... सत्याचं बोलणं मधेच तोडत नेहा नटवे पुन्हा बोलती झालीच...

नेहा नटवे- म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा करायची आणि प्रतिष्ठा पणाला मुख्यमंत्र्यांची लावायची असंच ना...

आदित्य विचारे - प्रतिष्ठाबितिष्ठा चार तारखेला बघू. तू जरा शांतता राख. विचारेंनी समजावल्यावर नेहाने बुमच बॅगेत टाकला.

रोहित राजे - हा तर, हातकणंगलेमध्ये जनता कुणाला हात देते आणि कुणाला हात दाखवते तेही महत्त्वाचं ठरणार आहे बरं का. हातकणंगलेमध्ये जी दोन नावं आहेत ना ती नावंच लय भारी आहेत बघा. ठाकरेंचे शिलेदार सत्यजित पाटील आणि शिंदेंचे शिलेदार धैर्यशील माने. खूपच अटीतटीची लढत होईल असं वाटतंय बघा.

सत्या – बघा तुम्ही रोहित राजे, तुम्ही बघतच राहा. आणि मी काय म्हणतो, त्या शिरूरचा काय? शिरूरमध्ये तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. आणि शिर्डीतही तीच अवस्था. शिंदेंचे सदाशिव लोखंडे आणि ठाकरेंचे भाऊसाहेब वाकचौरे उभे ठाकले आहेत. म्हणजे या ठिकाणीही शिवसैनिकांमध्येच सामना रंगणार आहे तर. शिर्डीची जनता कुणाला हात आणि साथ देणार हे शिर्डीचे साईबाबाच जाणो...

आदित्य विचारे - रोहित राजे, म्हणजे या लोकसभा निवडणुकीत अनेक वर्ष खांद्याला खांदा लावून लढणारे शिवसैनिक आणि शिवसेना नेते एकमेकांविरोधात रिंगणात उतरले आहेत, असं म्हणावं लागेल तर...

सत्या - होय विचारे...नेतेही शिवसेनेचे आणि मतदारही शिवसेनेचे...काय वेळ आलीय या महाराष्ट्रावर...

रोहित राजे - एवढंच कशाला विचारे, यवतमाळ-वाशिममध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या राजश्री पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख यांच्यात सामना रंगणार आहे. आणि हो, त्या हिंगोलीतही दोन्ही नेते शिवसेनेचे आहेत. ठाकरेंचे नागेश आष्टीकर आणि शिंदेंचे बाबुराव कोहळकीर...

सत्या - 2024ची लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रासाठी पर्यायाने महाराष्ट्राच्या जनतेसाठी जड जाणार आहे. मतदान कुणाला करायचं आणि कुणाला नाही, हे जनता ठरवणार असली तरी आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था आहे. मग तो पक्ष दुभंगलेल्या शिवसेनेचा असो की फुटलेल्या राष्ट्रवादीचा...लोकसभेत हार-जीत कुणाची याच्यापेक्षा सत्तेची सूत्रं कुणाच्या हाती, हेच जास्त महत्त्वाचं ठरणार आहे, विचारे बरोबर ना...
इतक्यात आतापर्यंत एकही शब्द न बोलले सदा सामान्ये बोलते झाले. त्यांनी सर्व चर्चा ऐकली होती.

सदा सामान्ये - भाजपा जिंको, ठाकरेंची शिवसेना जिंको, शिंदेंच्या शिवसेनेचा विजय झाला काय आणि शरद पवारांची राष्ट्रवादीने बाजी मारली काय की अजित पवारांची राष्ट्रवादी जिंकली काय...पराभव होणार आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेचा...त्यांच्यासमोरच मोठं आव्हान आहे - राजकीयदृष्ट्या दुभंगलेल्या महाराष्ट्राला सावरायला पुन्हा एकदा गर्जा महाराष्ट्रच म्हणावा लागणार आहे आणि मशालीही जनतेलाच पेटवाव्या लागणार आहेत.

Post a Comment

0 Comments