Header Ads Widget

धाकधुक मनात झाली सुरू, सांग सांग खुर्चीसाठी किती झुरू?


धाकधुक मनात झाली सुरू, सांग सांग खुर्चीसाठी किती झुरू?

४ जून देशासाठी महत्त्वाचा दिवस. लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार हे ४ जूनला ठरणार आहे. एनडीए की इंडिया आघाडीला सत्तेच्या खुर्चीत बसवायचं हे जनतेनं ठरवलं आहे. त्यामुळे नेत्यांच्या मनात धाकधुक वाढली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये कोण बाजी मारणार आणि धाकधुक का वाढली आहे यावर पिंपळपारावरच्या बैठकीत चांगलीच चर्चा रंगली.  

आज कधी नव्हे ती पत्रकार नेहा नटवे पिंपळपारावर सर्वात आधी पोहोचली होती. नेहा नटवेने पर्समधला बूम काढला आणि चक्क पिंपळपारावरच रिपोर्टिंग सुरू केली.

नेहा नटवे - चार जूनला निकाल लागणार आहे. निकालात कोण बाजी मारणार आणि कोण घरी बसणार, याकडे आमची गेल्या अनेक दिवसांपासून नजरा आहेत. पोलबोलखोल के आम्ही हे सर्व दाखवत आहोत. आमचे पोल कुणाच्या बाजूचे असले तरी सत्य परिस्थिती चार जूनलाच कळणार आहे....तेव्हा कुठेही जाऊ नका...नेहा बोलत असतानाच सत्या कडवटे आला आणि बोलता झाला.

सत्या - अगं बये नटवे, तू काय आमच्या पिंपळपाराचा ओपन स्टुडिओ केलास की काय? ते चॅनलवाले निवडणुकीपूर्वी मतदारसंघात जाऊन करतात तसा...तुम्हा पत्रकारांचं या वर्षी काय खरं नाही बघ. आता लोकसभा, नंतर विधानसभा आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेतच...कोण जिंकणार आणि कोण हरणार , अशा बोंबा मारायला. वाऱ्याने केस पिंजारले आहेत ते ठीक कर आणि खाली बस. थोडा आराम कर...नाही तरी चार जूनला घसा कोरडा करायचा आहेच. कोरडा दुष्काळ पडलाय तिकडे बघू नका, पण निवडणुकांवर आरडाओरडा करा...चालू द्या तुमचं...आधी खाली बस...बूम ठेव आणि बुड टेक...

नेहा नटवे - बसते...बसते...सत्या, तुला ना आमच्या कामाची कदरच नाही. देशात केवढी मोठी हॅपनिंग होणार आहे, बघतोस ना...काँग्रेस म्हणते भाजपा हरणार, भाजपा म्हणते काँग्रेस हरणार...

सत्या - ते म्हणणारच...तुम्ही आणि वेगळचं म्हणता...जनतेचा आवाज वेगळंच सांगतोय...चर्चा आणि चर्चा. डोकं फिरायची वेळ आलीय...इतक्यात तरातरा चालत आदित्य विचारे पिंपळपारावर दाखल झाले. 

आदित्य विचारे - मी काय म्हणतो, चार जूनसाठी काय तयारी करायची...

नेहा नटवे - काय म्हणजे काय, अहो विजयाची तयारी करा, गुलाल उधळा, ढोल ताशे बडवा, पेढे, लाडू वाटा, लोकशाहीच्या विजयाचा जल्लोष साजरा करा...आम्ही आहोतच ना बूम आणि कॅमेरा घेऊन...जगाला दाखवू.

आदित्य विचारे - पण कुणाच्या विजयाचा जल्लोष करायचा...एनडीएचा की इंडिया आघाडीचा की नसलेल्या आघाड्याबिघाड्यांचा...

सत्या - तुम्ही कोणाचाही विजयोत्सव करा हो, नेटा नटवे नटूनथटून येणार आहे...आणि प्रश्न काय विचारणार...तुम्हाला काय वाटतं?...वाटता वाटता विचारत वाटण्याच्या अक्षता लावता...सत्या जरा हसूनच बोलला तसं नेहा नटवेनं नाक मुरडलं आणि बोलली..

नेहा नटवे -असू दे, असू दे...आमचं ते कामच आहे आणि करतच राहणार...

आदित्य विचारे - पण मी काय म्हणतो, सदा आले पण अजून रोहित राजे कुठे राहिले...नाही तर सर्वात आधी येतात म्हणून विचारले. सत्या, फोन करून विचारतोस का?

 सत्या - फोन लवातो, पण या रोहित राजेंनी टेन्शन घेतला असेल ४ जूनचा. धाकधुक वाढली असेल त्यांची...अहो विचारे, ते बघा. रोहित राजे धाप घालत येत आहेत. 

आदित्य विचारे - यांना आतापासूनच धाप लागली का? पुढे कसा होणार?

सत्या - पुढे काय होणार म्हणजे...जो जिंकेल त्यांच्याकडे उडी घेणार हे रोहित राजे...कारण ज्याच्या हाती ससा तो पारधी, तसं आपल्या देशाचं झालंय. ज्याच्या हाती सत्ता तो शिकारी...एव्हाना रोहित राजे धापा टाकत पिंपळपारावर पोहोचले. घामाघूम झालेल्या रोहित राजेंनी रुमालाने घाम फुसला, घटाघटा पाणी प्याले आणि दीर्घ श्वास सोडला. 

नेहा नटवे - हा तर रोहित राजे, आता कसं वाटतंय?

रोहित राजे - तू थांब आधी. कसं वाटतंय काय, गरमीने लय लय गरम वाटतंय. 

नेहा नटवे- वाटलंच मला, तुम्हाला गरमीने घाम कमी आणि निकाल लागण्याच्या भीतीने जास्त फुटलाय. नेहा नटवेंना बूम पुढे केला... इतक्यात आदित्य विचारे बोलते झाले.

आदित्य विचारे - जाऊ दे नेहा, मी काय म्हणतो रोहित राजे, आज तुम्हाला यायला उशीर का झाला? निकालापूर्वी पक्षाचा मंथनबिंथन होता काय?

 रोहित राजे - अहो विचारे आणि कडवटे, काय सांगू तुम्हाला? झोपच लागत नाही. जसे जसे निकालाचे दिवस जवळ येत आहेत ना तस तशी झोप उडत चालली आहे. देशात कुणाची सत्ता येणार हे लाबंच राहिलं, पण राज्यात कोणाला संधी मिळणार यावरून झोप उडाली आहे. 

सत्या - झोप उडणारच ना...विकासकामं केली असती तर झोप उडाली नसती. आश्वासनाचे पोकळ बाण सोडायचे आणि मिसाईल सोडलं म्हणून छातीठोकपणे सांगायचे. गेल्या पाच वर्षात राज्याचा विकास किती टक्के झाला हेसुद्धा सांगता येत नाही तुम्हाला. 

आदित्य विचारे - अरे सत्या असा काय बोलतंस...रोहित राजे विकासाच्या बाजूनेच आहेत. मात्र विकास कोणत्या बाजूने जाईल हे सांगता येत नसल्याने त्यांची धाकधुक वाढलीय. 

रोहित राजे - माझा विरोधक विकास कोणत्या बाजूने गेला तरी मला काय फरक नाही. मात्र सत्ता यायला हवी. कारण प्रश्न खुर्चीचा आहे. हातात सत्ता असली की....इतक्यात नेहा बोलती झाली.

नेहा नटवे - हो ना, सत्ता तुमच्या हातात हवी मग कसंही वागता येतं. कसंही काहीही करता येतं. वाघाला शेळी म्हण असंही तुम्ही सांगणार आणि विचारणार हा वाघ नाही शेळी आहे....शेळी आहे ना...हो की नाही, असं विचारणार आणि बिंबवणार आणि पैसे देऊन आलेली माणसे कसलाही विचार न करता हो म्हणणार, माना डोलावणार...आणि काय हो रोहित राजे, तुम्ही राजकारणी सभेला आलेल्या माणसांना भाडोत्री म्हणणार...ही जनताही कसं ऐकून घेतं हेच कळत नाही.

 सत्या - जाऊ दे सर्व...पण रोहित राजे तुम्हाला घाम का फुटला ते सांगा?

आदित्य विचारे - हो सांगा आधी. तुमचा बीपीबीपी वाढला तर नाही ना...

रोहित राजे - अहो काय सांगणार...मी कितीही विकास झाला म्हटला तरी विकास काय झाला आहे हे सर्व जनता जाणत आहे. किती जणांना रोजगार दिला हे तरुण जाणत आहेत. किती लघुउद्योग धुळीला गेले हे उद्योजकांना माहीत आहे. शायनिंगच्या नादात 'विझ'निंग जास्त झाल्याची चर्चा रंगली आहे. आश्वासनांची खैरात केली खरी, मात्र गेल्या पाच वर्षांतील अनेक आश्वासनं अधांतरीच आहेत. एका चांगल्या कामाचा गवगवा केला जातोय. त्याच्या नावाखाली अन्य काही कामांचा पाढा वाचला जात आहे. सर्वसामान्यांसाठी योजनांचा पाऊस पडला. मात्र प्रत्यक्षात किती लोकांना फायदा झाला याचं गणित चुकलंय. त्यामुळे प्रचार करताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. लोकांनीही टाळ्या वाजवल्या, मात्र या टोळ्या मतदानात परिवर्तीत होतील की नाही, हे सांगता येत नाही. 

सत्या - त्यातच महाराष्ट्रात वेगळीच स्थिती आहे ना रोहित राजे. मतदान करायचं कुणाला, हा जनतेला प्रश्न पडलेला नाही असंच गृहित धरलं गेलं ना...म्हणजे या पक्षात चांगला नेता असेल तर त्याला मतदान करावं असं जनता ठरवते मात्र आपण त्या ठिकाणी कोणता नेता देता? तोच ना...घराणेशाहीच्या नावाखाली ओरड करायची आणि शेवटी गेले अनेक वर्षं त्याच त्याच घरातील माणसं उभी राहतात. नवीन संधी  दिली तरी त्याच घरातील नेत्यांच्या मुलांना दिली जाते. कधी या मतदारसंघातून तर कधी त्या मतदारसंघातून...

आदित्य विचारे - रोहित राजे, तुम्ही निवडणुकीवर कोट्यवधी रुपये खर्च करता, खर्च कसला उधळण करता म्हणूया...मी काय म्हणतो, निवडणूक प्रचारावर एवढा खर्च करण्याची वेळ तुमच्यावर का येते हो... आणि सर्व पैसा उद्योजकांकडून घेता किंवा अन्य कुणाकडून घेता. मग त्यांना सवलतींच्या खिरापती वाटता. त्यापेक्षा जनतेच्या विकासासाठी कामांची खिरापत केली असती तरी आश्वासनांची खैरात आणि पैशांचा पाऊस पाडण्याची तुमच्यावर वेळच आली नसती. आणि सत्ता कुणाची येणार आणि कोण राहणार, सत्तेची खुर्चीवर कोण बसणार यांची चिंता सतावली नसती. विचारेंनी सडेतोड विचार मांडले तसे रोहित राजे गप्प बसले. 

सत्या - अहो विचारे, या राजकारण्यांचा विचार वेगळा असतो. जनतेला गृहित धरलं जातं आणि जनताही तेच करतं. आता काही जण नोटाचा वापर करत असतील. पण लोकशाही सुदृढ होण्यासाठी मतदान करायलाच हवं, पण मी म्हणतो निडवणुकीत उभा राहणारा नेता कुठे सुदृढ असतो. कोणत्या ना कोणत्या दगडाखाली त्याचे हात अडकलेले असतातच ना...हे टीव्हीवाले, ते पेपरवाले छापतातच ना. जनतेनं लोकशाहीसाठी मतदान करावं आणि त्या लोकशाहीचे नेते भ्रष्टाचाराने पोखरलेले असावेत, ही बात काही हजम होत नाही, विचारे. सत्या परखडपणे बोलला. 

रोहित राजे - हे बघा, आता जे झाले ते झाले. प्रचार झाला, ईव्हीएममध्ये भविष्य बंद झालं. आता ४ तारखेकडे डोळे लागले आहेत. जनतेने ईव्हीएममधून जे काय व्यक्त केलंय त्याचा परिपाक ४ जूनला दिसणार आहे.

नेहा नटवे - काय हो रोहित राजे, तुमचा ईव्हीएमवर भरवसा आहे का? तसं नाही हो,उलटसुलट चर्चा होतात ना म्हणून विचारलं. त्याची कमाल दिसेलच म्हणा. विरोधक असो की सत्ताधारी जनतेला गृहित धरलं की सर्व प्रश्न सुटले असं तुम्ही समजूनच जाता...कारण जनतेच्या विस्मृतीचा तुम्ही खूप फायदा उचलता. त्यांना नवीन पर्याय न देता उमदेवार अदलाबदल करून देता....नटवेनं छोटेखानी विश्लेषण मांडलं.

इतक्यात आतापर्यंत शांतपणे चर्चा ऐकणारे सदा सामान्ये बोलते झाले. 

सदा सामान्ये - सर्वच राजकीय पक्षांची धाकधुक वाढली आहे. देशाचं आणि राज्याचं राजकारण विकासाच्या मुद्द्याबरोबरच भावनिक मुद्द्यावर सुरू आहे. निवडणुकीचा प्रचारही तसाच होता. कुणी कुणाचा बाप काढत  होता. कुणी कुणाची भाऊ काढत  होता. कुणी बहिणीसाठी पुढे येत होता तर बहीण भावासाठी हात पसरत होती. कुठे मुलाच्या प्रचारासाठी आई उतरत होती तर कधी वहिणीच्या प्रचारासाठी नणंद धावत होती. राजकीय वैऱ्याच्या लढ्यात जनताच भरडली गेली. नोटा हा पर्याय असला तरी कोणताही पक्ष अन्य घरातला उमेदवार देत नाही. मात्र दुसऱ्याच्या घराणेशाहीवर तोंडसुख घेतलं जातं. तेच नेते, तीच घराणी. अपक्षांना फोडलं जातं. त्यामुळे निकोप हा शब्द राजकारण्यांनी डिक्शनरीमधून गायब केलाय. आता उरलाय तो फक्त कोप. जनतेचा हा कोप ४ तारखेला दिसेलच. मात्र कोणताही नवा घरातला नवा उमेदवार जनतेसमोर येत नाही, नवी संघटना, नवा पक्ष जोमाने येत नाही तोपर्यंत निकोप लोकशाही कशी काय म्हणता येईल? सदा सामन्ये यांनी प्रश्न उपस्थित केला आणि पिंपळपारावरची बैठक संपली. जाता जाता सदा सामन्ये म्हणाले, 

चला आता पुन्हा भेटूच...निकालानंतर....निकालाचं विश्लेषण करायला.  


Post a Comment

0 Comments