Header Ads Widget

मतदारांनी 'करेक्ट कार्यक्रम' केला


मतदारांनी 'करेक्ट कार्यक्रम' केला

लोकसभा निवडणूक २०२४ इतकी अस्थिर आणि धास्ती वाढवणारी निवडणूक यापूर्वी झाली नाही. अनेक दिग्गजांना पराभवाचे धक्के सहन करावे लागले. मतदारांना गृहित धरणं पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं ठरलं. एनडीए असो की इंडिया आघाडी असो, महाराष्ट्रात महायुती असो की महाविकास आघाडी. पक्ष असले आणि नेते असले म्हणजे काहीही करता येते या गृहितकाला मतदारांनी झिडकारलं. महाराष्ट्रासारख्या राज्यात मतदान टक्केवारी ५०-५५ टक्क्यांच्या घरात असतानाही मतदारांनी त्यातून योग्य संदेश दिलाय. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातलं राजकारण नको त्या पातळीइतकं खाली गेलं. अगदी न्यूनतम पातळी गाठली. मात्र मतदारराज सजग निघाला. तुम्ही काहीही कराल आणि आम्ही खपवून घेऊ असं चालणार नाही, हे ईव्हीएममधून दाखवून दिलं. खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी 'पक्षांचा करेक्ट कार्यक्रम' केलाय. याच विषयावर पिंपळपारावर बैठक रंगली.

आज कधी नव्हे तर सर्व जण एकाच वेळी पिंपळपारवर एकत्रित आले. आधीच उन्हाचा कहर त्यात निवडणूक निकालाने घाम फोडल्याने सर्व जण हाश्यहुश्य करत पारावर स्थानापन्न झाले. आदित्य विचारेंनी आणलेली थंड पाण्याची बाटली केव्हाच रिकामी झाली. इतक्यात पत्रकार नेहा नटवेनं बूम पुढे केला. अजून पुढे केला असता तर रोहित राजेंच्या तोंडातच  गेला असता....

नेहा नटवे - अहो. काय हो रोहित राजे, उन्हाने घाम फुटलाय की लोकसभा निवडणुकीत लागलेल्या निकालाने. नाही म्हटलं तर चित्र जरा स्पष्टचं दिसतंय.

रोहित राजे- नटवे, तो बूम आदी बाजूला ठेव. इथं काय करावं ते आता सूचत नाही...आणि तू काही पण काय विचारतेस...इतक्यात आदित्य विचारे बोलते झाले.

आदित्य विचारे - काही पण नाही, पण नेहाने थेटच विचारलंय. लोकशाहीत लोकांनी लोकांचा योग्य हक्क कसा वापरावा हे दाखवून दिलंय. फुगलेल्या बेडकाची हवाच निघून जावी तसं काहीसं झालंय या पक्षांचं आणि नेत्यांचं.

सत्या कडवटे -नाही तर काय, विचारे तुमचं म्हणणं अगदी सत्य आहे. निवडणूक प्रचारात ज्या काही जागांचा वल्गना केल्यात त्या जागाच जिंकता आल्या नाहीत, निवडणूकपूर्वी मारलेल्या फुशारक्या मतदारांनी ईव्हीएममधून उतरवल्या, सत्या मधेच बोलला.

 नेहा नटवे - मी काय म्हणते, देशभरात प्रचारासाठी पाण्यासारखा पैसा ओतला, सभा घेतल्यात, दौरे केलेत, रोड शो केलेत, मात्र म्हणावा तसा फरक दिसला नाही. रोहित राजे,तुमचं काय चुकलं काय?

रोहित राजे - आमचं काय चुकलं? निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही हवं ते केलंय. काय नाही केलंय. सर्व रणनीती आखली...

सत्या - पण तुमची ती रणनीती मतदारांनी चुलीत घातली ना. फोडाफोडी, चिन्हाची, पक्षाची चोराचोरी, सरकारी यंत्रणांचा वापर, विकासाचे मुद्दे जनतेला पटलेलेही नाहीत आणि पचलेलेही नाहीत. सत्तेच्या जोरावर सर्व काही करता येतं या विचारांना मतदारांनी....मारलं. 

आदित्य विचारे - हो ना, घड्याळ चोरलं तरी तुतारी वाजली, धनुष्यबाण चोरला तरी मशाल पेटली...उत्तरेत राम मंदिर बांधलं, मात्र विरोधकांनी बाजी मारली, मी काय म्हणतो रोहित राजे, जनतेला आणि एखाद्या व्यक्तीला गृहित धरणं तुम्हाला भोवलं का? आणि मुंबईत तुम्ही ज्यांना महत्त्व दिलं ते आता ब्रही काढत नाहीत म्हणे. नाही ते बिनशर्त तुम्ही जिंकणार होतात ना, म्हणून विचारलं.

सत्या - अहो विचारे, या रोहित राजेंची मती आता गुंग झालीय. यांचं कसं झालंय, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. आता सत्तेसाठी वाटाघाटी करताना खूप काही गमावावं लागणार आणि थोडंसं हाताशी ठेवावं लागणार...आणि काय गं नटवे, तू जे काय घसा कोरडा करून पोलबिल सांगत होतीस ना... कुठे गेले ते सर्व अंदाज. बिलात का? तुम्ही मीडियावाल्यांनी भारी हवा केली होती. मला वाटतं, जनतेनं सरकारपूर्वीच  मीडियाचीच हवा काढली.

 नेहा नटवे - ए सत्या, तू आमच्या मीडियाबाबत काही बोलू नकोस. आम्ही आजही सत्य आहे तेच मांडतो.

सत्या - तुम्ही सत्यच मांडता, पण लोकसभा निवडणुकीचा निकाला मात्र अर्धसत्यासारखा मांडलात. ते पोलचे आकडे कुणी दिले होते गं तुला?

नेहा नटवे - ते आम्ही जनतेला विचारून ठरवतो. जनतेचा कौल असतो तो?

सत्या  - मग जनतेचा कौल यावेळी फसला कसा? तुझ्या तर तोंडावर घाम दिसत होता ब्रेकिंग एके ब्रेकिंग वाचताना.अमका पिछाडीवर, तमका आघाडीवर, अमका पराभूत, तमका विजयी...एकावर एक धक्के आणि ते राजकीय नेत्यांचे प्रवक्ते... आपलं तेच खरं...

आदित्य विचारे - असू दे सत्या, तिचा काय त्याच्यात दोष, पोटापाण्याचा प्रश्न आहे. पण रोहित राजे, मी काय म्हणतो, या प्रचारात गरिबी, महागाई, वाढते खर्च, बेरोजगारी, शेतकरी या मुद्द्यांना काय बासनात ठेवला होता का? कलश लावायच्या आधीची प्राणप्रतिष्ठा झाली म्हणे...अशी सोशिक आणि सोशल मीडियावर चर्चा होती म्हणे. आता मी काही गेलेलो नाही, मात्र उत्तरेतसुद्धा जनतेने म्हणे उत्तर दिलंय. 

रोहित राजे - विचारे तुम्ही उत्तरेचा कसला विचार करता, मी इथे महाराष्ट्राचा विचार करतोय. ते आकडे आता डोळ्यांसमोर ना गरागरा फिरत आहेत. 

सत्या - आकडे फिरणारच ना. जनतेला सट्टाबाजी नाय आवडत. कारण महाराष्ट्रात मतदान हा विकासाच्या मुद्द्यावर कमी आणि भावनेच्या भरावर जास्त होतं. महाराष्ट्रातलं राजकारणं एवढं बिघडलं की महाराष्ट्राच्या जनतेला ते नाही आवडलं. कोणाच्या जागा किती आल्या आणि कुणाच्या जागा वाढल्या यात सर्वसामान्य जनतेला रस नाही. सर्वसामान्य जनता, तरुण, शेतकरी दोन वेळच्या घासाच्या आशेवर असतात. त्याला टोकाचं राजकारण करायला नाही आवडत. मात्र कोरोनापूर्वी ते कोरोनानंतर महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर आणि विकासात्मक पाऊल उचलणाऱ्या सरकारची आवश्यकता होती. मात्र तुम्ही कुबड्यांचं सरकार तयार केलं. त्याला तुम्ही तुमच्या सोयीसाठी डबल आणि ट्रिपल इंजिनचं नाव दिलं. या इंजिनामध्ये फक्त आश्वासनांच्या वाफा होत्या हे  या जनतेला कळून चुकलंच होतं. जगात म्हणे बुलेट ट्रेन तोट्यात आहे,मात्र भारतात त्याचा घाट घातला जातोय, अशी चर्चा रंगलीय. सर्व शायनिंग प्रकल्पांमध्ये सर्वसामान्यांना स्थान काय, त्यांना त्यातून रोजगार मिळणार का, बरं ज्या कंपन्या उभ्या राहणार त्यात काम करण्याचं प्रशिक्षण तरुणांना-तरुणांना दिलंय का? यावर विचारविनिमय झाला का?....सत्याने रोहित राजेंच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं होतं. त्यामुळे रोहित राजे गप्पच बसले होते. इतक्यात आदित्य विचारेंनी तोंड घातलं.

आदित्य विचारे - नाही तर काय? रोज सकाळी टीव्ही पाहावं तर या नेत्यावर धाड, त्या नेत्यावर धाड, त्या नेत्याच्या विरोधात मोर्चा, या नेत्याच्या विरोधात रॅली. दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला मात्र दुर्लक्ष. या नेत्याची त्या नेत्यावर टीका, एकाने आज एकाची उणीधुणी काढायची, नंतर दुसऱ्याने तिसऱ्याची उणीधुणी काढावी. एकमेकाची धूत राहितात आणि जनता बिचारी बघत राहिली. महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या स्तरावर नेऊन ठेवलात, राजे तुम्ही...अहो राजकारणाची खालावलेली पातळी यापूर्वी महाराष्ट्राने पाहिली नाहीत. तुम्ही नेते लोक प्रत्येकाचा करेक्ट कार्यक्रम करत राहिलात आणि जनता मात्र बघत राहिली. तिच्याजवळ एकच पर्याय होता तो म्हणजे निवडणुकीत 'महाराष्ट्राचं इनकरेक्ट पॉलिटिक्स करेक्ट करण्याचं'....इतक्यात आतापर्यंत शांतपणे चर्चा ऐकणारे सदा सर्वसामान्ये बोलते झाले...

सदा सर्वसामान्ये - जनतेने अर्थात मतदारांनी राजकीय पक्षांचा मग तो देशातला असो की राज्यातला - करेक्ट कार्यक्रम केला. प्रत्येक वेळी चेहराही गृहीत धरू नका आणि मतदारालाही गृहीत धरू नका,असा संदेश दिला आहे. आता विधानसभेत करेक्ट कार्यक्रम करून घ्यायचा नसेल तर आतापासूनच विकासाची करेक्ट रणनीती आखा, अन्यथा...मतदार करेक्ट कर्यक्रम करतील.

(पिंपळ पारावरची बैठक संपली आणि सर्व जण आपापल्या घरी गेले)

जाहिरात - अभिज्ञान अकादमी



Post a Comment

0 Comments