प्रचाराची पातळी, इतकी का घसरली ?
लोकसभा निवडणूक 2024चा प्रचार विकासाच्या मुद्द्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर आलाय. राजकीय सभ्यता आणि संस्कृतीचा पालापाचोळा राजकीय नेत्यांनी करून ठेवलाय. त्यामुळे राजकीय संस्कृतीच वेशीवर टांगली गेली. कोणत्या नेत्यांनी कोणत्या नेत्यावर टीका करावी, याचे भान निवडणूक प्रचारात दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका करताना अतृप्त आत्मा 50 नाही तर 56 वर्ष महाराष्ट्रात भटकतोय अशी केली. त्यानंतर होय, मी भटकती आत्मा आहे असं म्हणत शरद पवारांनी उत्तर दिलं. देशातील राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती निवडणूक प्रचार करताना वैयक्तिक पातळीवर येत असतील तर बाकीच्या नेत्यांचा विचार करणं सोडावं लागेल. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातही मतदानाचा टक्का घसरलाय. याकडे लक्ष न देता सर्वच राजकीय पक्षांचे नेते आग एकीकडे बंब दुसरीकडे असा प्रचारकी थाट करत आहेत. चार जूनला निकाल असला तरी घसरेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे कुणाला फटका बसेल याचा नेम नाही.
लोकसभा निवडणूक 2024च्या प्रचारात टीकेच्या भाषेची पातळी एकदमच खालावलीय. दादा, बहीण, बाप,काका, भावजय असा प्रचारकी थाट झालाय. वाचाळवीरांना कोण आवरणार? असा प्रश्न निर्माण झालाय. राजकीय नेत्यांच्या भाषणांमध्ये कोणते शब्द असावेत याच्यावर आचारसंहिता लागू करण्याइतपत चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. अनेक प्रचारसभांमध्ये विकासाचा मुद्दाच भरकटवला जातोय. पक्ष चोरलाय. चिन्ह चोरलंय, बाप चोरलायपासून तो पक्ष आमचाच, हा नेता आमचाच, गद्दारीचे मुद्दे चर्चेत आहेत. गेल्या दहा वर्षात किती बेरोजगारी वाढली, किती महागाई वाढली, अर्थव्यवस्थेची स्थिती काय, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न किती आणि कशा प्रकारे सोडवले गेले यावर मोठ्या प्रमाणात प्रचार होताना दिसत नाही. खरं तर देशात गेली 10 वर्ष एनडीए सरकार आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षात कोणती विकासकामं झाली याची ब्लूप्रिंट सादर होणं आवश्यक होतं. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचा विश्वास बसला असता. त्याचबरोबर विरोधकांनीही त्याचा हिशेब मागायला हवा होता. विरोधकही एखाद दुसऱ्या सभांमध्ये केंद्र सरकारने काय केलं त्यावर भाष्य करताना दिसतात.
या निवडणुकीत काही मुद्दे तर गरज नसताना उकरून काढले गेले आहेत. अर्थात हा राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो. मात्र तोंडावर आपटण्याची वेळ आलीय. 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ला पुन्हा चर्चेत आला. हल्ल्याच्या जखमा या तीव्र आहेत. या हल्ल्यात ज्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला असेल त्यांनी आता सत्ताधारी आणि विरोधकांनी टीकेच्या फैरींमुळे कानावर हात ठेवले असतील. डोकं ठिकाणावर आहे का, असा प्रश्न उपस्थित व्हावा असा प्रचाराचा धुरळा उडवला जातोय. आश्वासन, वचन, शब्द यांच्या पंक्तीला नवा शब्द येऊन बसलाय. त्याचं नाव आहे गॅरंटी. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत गॅरंटी शब्द वापरत आहेत. विकासाची गॅरंटी देत आहेत तर विरोधक 4 जूनला भाजपा सरकार येणार नाही असं म्हणत गॅरंटीची वॉरंटी विचारत आहेत. अनेक सभांमध्ये अमूक एका नेत्याला मत द्या मग त्याचे हात मजबूत होतील, तमक्याला मत द्या मग अमका विकास करेल...प्रचाराची पातळी इतक्या वैयक्तिक पातळीवर घसरलीय. डोकं ठिकाणावर असण्यापासून ते मानसिक आरोग्य विचारण्यापर्यंत प्रचाराची पातळी खालावलीय. नकली-बेअकली या शब्दांचाही वापर होतोय.
या लोकसभा निवडणुकीत आणखी एक प्रचाराचा मुद्दा बनवला गेला तो म्हणजे संविधानाचा. संविधान बदलण्यासाठी सत्ताधाऱ्यांना 400 वर जागा हव्यात अशी टीका विरोधकांनी सुरू केलीय. त्यामुळे संविधान वाचवलं पाहिजे असा प्रचार सुरूही आहे. तर मी जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही असं आश्वासन देत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. या आरोप-प्रत्यारोपात सर्वसामान्यांची मती मात्र गुंग झालीय. संविधानाबाबत नेमका कोणता पक्ष काय भूमिका घेतोय, कोणता पक्ष संविधानासोबत आहे आणि कोणता विरोधात आहे याचा संभ्रम व्हावा असा सांभ्रमिक प्रचार सुरू आहे.
देशापुरता नाही म्हटलं तरी राज्याच्या पातळीवरील प्रचार पाहता तोही विकासाच्या पातळीवर नाही तर वैयक्तिक पातळीवर होताना दिसतोय. राज्यात किती प्रकल्प आले, किती बंद झाले, किती प्रस्तावित आहेत, प्रकल्प दुसऱ्या राज्यात का जात आहेत, याबाबतचा जाब विचारणारा प्रचार होत नाही. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती काय आहे, याच्यावर भाष्य करणार प्रचार व्हायला हवा. राज्यातील शैक्षणिक स्थिती काय आहे, जूनमध्ये शालेय शिक्षण विभाग आणि स्कूल बसमुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर तोडगा काढण्याबाबत काही विचारविनिमय व्हायला हवा होता, धरणं, विहिरी तळ गाठत आहेत. तर विहिरींच्या पाणीपातळीतही घट होतेय. पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. दरवर्षीचा हा प्रश्न आहे. आश्वासनं देऊन तात्पुरती तहान भागवली जाते. मात्र पाणीटंचाईचा प्रश्न काही सुटत नाही. तो पाचवीचा पुजलेला आहे. राज्यातील पाणीबाणीवर 'मलमपट्टी उपाय' करून भागणार नाही. एक समृद्धी झाला याचा अर्थ उर्वरित महाराष्ट्र रस्त्यांच्या दृष्टीने समृद्ध झाला असं मानता येणार नाही. अनेक रस्त्यांची दुरवस्था झालीय. त्यावर भाषणं व्हायला हवीत. मात्र एकमेकांचे हेवेदावे करणारे प्रचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकही प्रतिष्ठेची आहे. कुणी किती प्रतिष्ठा जपली आणि कुणाचा सुपडा साफ झाला आणि कुणाचा झेंडा फडकला हे 4 जूनला समजेल. मात्र एकूणच प्रचारातील भाषा पाहता जीभ घसरली जाते की जाणीवपूर्वक घसरवली जाते, हे पाहणं महत्त्वाचं आहेच, पण प्रचाराची पातळी घसरणार नाही, भाषा वापरताना शब्द घसरणार नाहीत याचं भान ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
0 Comments