...तोपर्यंत माझा महाराष्ट्र 'अनाथ' आहे
सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. टीका झाल्यानंतर लाडका भाऊही योजना सुरू झाली. लाडकी बहीण योजनेचा लाभ होईल तेव्हा होईल, मात्र काही विचारवंतांच्या मते आपण अशा योजना 'लाडकी खुर्ची'साठी राबवण्यात येत आहेत. अशीच काहीशी चर्चा पिंपळपारावर रंगली आणि गप्पाबिप्पा सुरू झाल्या.
पत्रकार नेहा नटवे जरा जोशातच होती. पिंपळपारावर सर्व जण जमा झाले नव्हते. नेहा नटवे आणि सत्या कडवटेच होते. नमस्कार - चमत्कार झाल्यानंतर नेहा नटवे बातमी द्यायचा सूर बदलून चक्क गावू लागली.
नेहा नटवे - सोनीयाचा ताटी उजळल्या ज्योती...
ओवाळीते भाऊराया... 'लाडक्या भावा'ची वेडी ही माया
नेहा नटवेंना पुन्हा हेच गाणं गायलं. तसा सत्या बोलता झाला
सत्या - अगं नटवे, लाडक्या भावाची नाही वेड्या भावाची वेडी ही माया असं ते गीत आहे...काय तरीच काय बडबडतेस...
नेहा नटवे - असू दे, असू दे....सध्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी म्हणे लाडकी बहीण योजना सुरु केलीय ना...तेच शब्द आता ओठात बसले आहेत. मी काय म्हणते...
सत्या - नको, नको, तू काय आता म्हणू नकोस..नाही तर लाडक्या भावासाठी लाडकी माया असंही गाशील...राहू देत...इतक्यात रोहित राजे पिंपळपारावर बसते झाले.
रोहित राजे - काय गं नटवे, नाक का फुगवलं ?
नेहा नटवे - नाक फुगवू नाही तर काय...मी एवढं लाडक्या भाऊरायाचं गाणं गात होते आणि सत्या उगाच त्यात कसपटं काढत होता...
सत्या - अहो रोहित राजे...या नटवेला आता १५०० रुपये मिळणार ना म्हणून खूश झालीय. आहे पत्रकार मात्र कागदावर...
रोहित राजे - जाऊ द्या रे...लाडका भाऊ योजनाही सुरु केलीय ना..मग तुझाही नंबर लागेल...तूही गाणं गा...इतक्यात दोन मिनिटांपूर्वीच दाखल झालेले आदित्य विचारे मध्येच बोलले.
आदित्य विचारे - कसलं काय आणि कसलं काय....निवडणूक यायच्या तोंडावर सगळेच लाडके आणि सगळेच दोडके....निवडणूक संपली की मात्र होतात परके...
रोहित राजे - अहो विचारे कसला विचार करता तुम्ही.. ? तुमचं वय बसत नाही का लाडक्या भाऊमध्ये...? मी आहे ना...रोहित राजे पुढे बोलणार इतक्याच सत्या बोलला.
सत्या - इथे तरुणांना रोजगार मिळत नाहीत, त्यांच्या हाताला काम नाही, उद्योगधंदे दुसरी राज्ये पळवत आहेत आणि तो जपानचा उद्योग किती तरुणांना रोजगार देणार...मी तर म्हणतो, फुकटच्या योजना थांबवा आणि रोजगार द्या...सत्या बोलत असतानाच मध्येच आदित्य विचारे जोरात बोलले.
आदित्य विचारे - नाही तर काय...सत्या बोलतो ते खरंच आहे. १५०० रुपयांवर बोलवण करण्यापेक्षा १५ हजारांची नोकरी मिळेल का, १५ हजार मिळतील एवढा रोजगार मिळेला, निदान १५ हजार मिळतील असा छोटासा व्यवसाय उभा करता येईल का, त्याकडे बघा...यांच्या खात्यावर पैसे, त्यांच्या खात्यावर पैसे...जे काय जमा करत सुटला आहात ते पैसे कुणाचे आहेत...?
रोहित राजे - विचारे, तुम्ही इतका पुढचा विचार नका करू. अहो, हे आमचं राजकारण आहे. आश्वासनं नको का द्यायला. आश्वासनं देणं हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही बजावणार, पूर्ण केव्हा होणार आणि कसा होणार ते मात्र वरच्याच्या हातात आहे... इतक्यात आतापर्यंत गप्प बसलेली नटवे पुन्हा बोलली.
नेहा नटवे - म्हणजे तुम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वी गाजर दाखवलं काय...आणि उद्या तुम्ही पराभूत झाला तर ही योजना गुंडाळणार काय ?
रोहित राजे - अहो थांबा...हे बघा, असे आरोप करू नका...आम्ही सर्वसामान्यांचा विचार केला आहे. ज्यांच्या घऱी कमावता कुणी नाही त्यांना याचा फायदा होणार आहे. किंवा ज्यांचं इन्कम कमी आहे त्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे.
सत्या - मग याचा सरकारच्या तिजोरीवर भार पडणार नाही का..? आदीच महाराष्ट्रावर ७.८ लाख कोटींचे कर्ज आहे. त्यात या योजनेचा मोठा भुर्दंड तिजोरीला बसू शकतो. त्यापेक्षा रोजगारनिर्मितीवर भर दिला असता तर भार वाचला नसता का ?
रोहित राजे - लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास करण्यासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी बारावी पास तरुणांना प्रतिमहिना ६ हजार, डिप्लोमाधारकांना ८ हजार आणि पदवीधारकांना प्रतिमहिना १२ हजारांचा भत्ता दिला जाणार आहे. या पैशांचा त्यांना पुढील शिक्षणासाठी फायदा होईलच की...
आदित्य विचारे - किती जणांना याचा फायदा होणार आणि काय हो...रोजगार उपलब्ध होणार नसतील तर हे तरुण शिकूनसवरून करणार काय....डिग्रीच घेऊन फिरणार ना...त्यातच मोठ मोठ्या परीक्षांना तर इतक्या परीक्षा द्याव्या लागतात की तो त्यातच अर्धमेला होतो....इतक्यात सत्याने कडवट बोल ऐकवायला सुरुवात केली
सत्या - आधीच शाळा बंद होत आहेत. सर्वसामान्य शिकला तर तो जागृत होईल, मतदान करताना विचार करेल, त्यामुळे शाळा बंद पडल्या तरी चालतील पण शिक्का मारणारा मतदार तयार झाला पाहिजे, अशा यांच्या योजना आहेत. नेता घडला नाही तरी चालेल, पण वडापाव खावून प्रत्येक आंदोलनात सहभागी होणारा बेरोजगार कार्यकर्ता हवा आहे. डोकी भडकल्यानंतर सारासार विचार न करता डोकी फोडणारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करायची आहे. डोकी फुटली तर ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांची...तुमची मुलं मात्र घरात बसणार, तुम्ही आदेश देणार...आणि कार्यकर्ते झेंड खांद्यावर घेऊन एकमेकांच्या छाताडावर बसणार... अहो, परवारचं उदाहरण बघा ना...मनसे आणि राष्ट्रवादीत जुंपली आणि या नादात एका तरुण कार्यकर्त्याचा जीव गेला. किती दिवस त्याच्या कुटुंबीयांकडे राजकीय पक्ष पाहणार आहे....ज्याचा जीव गेला तो कुणाचा तरी मुलगा होता, कुणाचा तरी भाऊ होता, अनेकांचा मित्र होता...एक दिवस श्रद्धांजली अर्पण कराल, रोहित राजे तुम्ही...पण मुलाचं कुटुंब मरेपर्यंत आठवणींची आसवं गाळत जगत राहील ना. तुमच्या या नीच राजकारणाला शिव्याशाप देत बसेल... माझं तर स्पष्ट मत आहे की, सर्वांना कौशल्यावर आधारित शिक्षण द्याच... सरकारी शाळांची अवस्था बघा... ज्ञानासारखं अमृत देणाऱ्या शाळा बंद आणि मंदिरं आणि मदिरालये सुरू असा उफरटा न्याय का करता...? सत्याचा आवाज बराच वाढला होता. रोहित राजेंनाही आता घाम फुटायला लागला होता.
रोहित राजे - सत्या सर्वच राजकीय नेते तसे नसतात. आम्ही घेणार त्याच्या कुटुंबीयांची काळजी...रोहित राजेंचा आवाज कातरला होता. तेवढ्यात आदित्य विचारे जरा जोरातच बोलले
आदित्य विचारे - कोण कुणाच्या पक्षात आहे तेच कळत नाही? पक्षांतर बंदी कायदा आता कागदावरच राहिलेला दिसतो. लाडकी बहीण योजना आणि नाहीतर लाडका भाऊ...तुम्हाला त्यातून काय साध्य करायचं आहे हे सर्वांना माहीत आहे. आता पाऊस सुरू आहे. भीतीच्या छायेत असणाऱ्यांचं अजून स्थलांतर झालेलं नाही. अहो, रोहित राजे, मोठे पूल नको, पण साधे साकवही बांधता येत नाहीत. हजारो मुलं जीव धोक्यात घालून शिक्षण घेतात ते याचसाठी का...? पुढे जाऊन ८ हजार आणि १० हजार मिळणार आहेत. ही जी काय खिरापत वाटत आहात ना...ती होणाऱ्या पिढ्यांवर खर्च करा...चिखलातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला रस्ता बांधून द्या...अर्थज्ञानाचे धडे पहिल्यापासून गिरवायला द्या. तुमच्या लाडकी बहीण आणि आणि लाडकी भाऊ योजना चांगल्या आहेत, मात्र आपण त्यातून नेमकं काय घडवणार आहोत आणि ज्यांना योजनेचा फायदा होणार आहे ते काय घडणार आहोत, याचा शोध घ्यायला हवा...आदित्य विचारेंच्या बोलण्याची धार वाढली...पिंपळपारावर फक्त सत्या आणि आदित्य यांचा आवाज घुमू लागला. इतक्यात आतापर्यंत सर्व वाद, विसंवाद गप्पपणे ऐकणारे सदा सामान्ये बोलते झाले.
सदा सामन्ये - महायुती असो किंवा महाआघाडी असो किंवा अन्य कोणतीही आघाडी...जोपर्यंत सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास होत नाही तोपर्यंत 'माझा महाराष्ट्र सर्वार्था'ने 'अनाथ' आहे.
0 Comments