Header Ads Widget

शर्त-बिनशर्त पाठिंबा

 


शर्त-बिनशर्त पाठिंबा

पिंपळपारावर पुन्हा एकदा चावडी जमली. रोहित राजे, आदित्य विचारे, सत्या कडवटे, नेहा नटवे, सदा सामान्ये पारावर जमले. कोणत्याही अटीशिवाय ते आले होते. राज्यात बिनशर्त पाठिंबा या शब्दावरून बराच खळ झाला. टीका-टोले, निशाणे साधले गेले. पाठिंबा शब्द झोपत नाही तोपर्यंत झोडला गेला. पिंपळपारावरही बिनशर्त पाठिंब्यावरून खलबतं सुरू झाली.

रोहित राजे – काय आदित्य विचारे, अहो, कसला विचार करताय. गावातल्या पुढारी म्हणवऱ्यांना बिनशर्त पाठिंबा द्यायचा विचार सुरू आहे की काय? त्याचं काय आहे, आम्ही पडलो राजकारणी आणि तुम्ही सामाजिक कार्यकर्ते. नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले की पाठिंबा कशाला हवा, काय बरोबर  बोललो ना?

पुढारी असलेल्या रोहित राजेंनी चर्चेला सुरुवात केली आणि पहिला बॉम्ब आदित्य विचारेंवरच डागला. राजेंच्या प्रश्नावरून आदित्य विचारेंनी रागातच बोलायला सुरुवात केली.

आदित्य विचारे – अहो रोहित राजे, तुम्ही पक्के आणि बेरकी राजकारणी आहात. तुम्ही राजकारण्यांनी विश्वास आणि पाठिंबा शब्दाचा पार चौथा करून ठेवलाय. तुम्ही ना, कधी कुणाला पाठिंबा द्याल आणि कधी कुणाचा विश्वास तोडाल हे गेल्या अडीच-तीन वर्षात डोक्यावरून जात आहे. विचार करून डोकं भिरभिरायची वेळ आलीय. बुलेट ट्रेनही इतक्या वेगाने पटरी बदल नाही इतक्या वेगाने तुम्ही राजकीय नेते पलटी मारता आहात. बाहेर तोंडाला तोंड लावायचं, पाठीमागे मांडीला मांडी लावून बसायचं. परवा तुमच्या घरी आलो तेव्हाच लक्षात आलं.

वा...वा...वा...काय छान. नेहा नटवे नेहमीप्रमाणे बुम पुढे करून बोलू लागली. तिने आदित्य विचारेंच्या तोडांतच बुम कोंबला असता. विचारेंनी तोंड फिरवलं म्हणून राहिला.

नेहा नटवे – आदित्य विचारे, तुम्ही फारच चांगला यमक जुळवलात हो. पटरी आणि पलटी...आम्ही पण आमच्या हेडलाईन्स आणि बातम्यांमध्ये भारी यमक जुळवतो. पण तुम्हाला नेमकं काय म्हणायचे आहे, पाठिंबा चांगला की पलटी चांगली?

नेहा नटवेचा प्रश्न ऐकून आदित्य विचारेंनी डोक्याला हात लावला तर रोहित राजे मोठ्याने हसायला लागले.

रोहित राजे – तुम्ही पत्रकारसुद्धा ना... चा मा करायचं सोडत नाही. राजकारणी हे एकमेकांना कोणत्या ना कोणत्या कारणांवरून पाठिंबा देत असतात. पाठिंबा तो पाठिंबाच ना....तुम्ही मात्र पाठिंबा एवढा पिटता, एवढा पिटता की पाठिंब्याचं पिठलं होऊन जातं.

आदित्य विचारेंनी मध्येच तोंड घातलं.

आदित्य विचारे – रोहित राजे, तुम्ही गावच्या राजकारणात आल्यावर किती वेळा युटर्न घेतला हो. आधीच गावात तुमचं वजन किती, तुम्ही बोलता किती, काम करता किती हे गावाच्या लोकांना चांगलंच माहिती आहे. दोन वर्षांपूर्वी दिलेला शब्द या वर्षी फिरवलात. आजकाल निघालेल्या वंदे भारतला दोन्ही बाजूंना इंजिन आहेत, मात्र तुम्ही अजून जनशताब्दीच्या इंजिनावरच अडकून पडला आहात. शेवटचा स्टेशन आला की बदला इंजिन. लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडत आहे. तुम्ही साथ मागितली तरी कुणी तुम्हाला हात देई नासे झाले आहे. मला काय म्हणायचे आहे, तुम्ही त्या रांबाड्यांना बिनशर्त पाठिंबा देता म्हणजे काय? चार वर्षांपूर्वी या रांबाड्यांनी रातांबे चोरले म्हणून आकाडतांडव केलात तुम्ही. मग आता त्यांना पाठिंबा देण्याची गरजच काय मी म्हणतो. त्यांनी तुम्हाला गाजर म्हणून रांबाड्यांनी रातांब्याची कोकमा दिली काय?

इतक्यात सत्या कडवटे चर्चेत सहभागी झाला. त्याने आदित्य विचारे आणि रोहित राजेंना थांबवत बोलायला सुरुवात केली.

सत्या कडवटे – रोहित राजे तुम्ही तुमची किती वेळा भूमिका  बदलता. ऋतू बदलतात तशी तुमची भूमिका बदलते. एकच भूमिका का घेत नाही. आणि मी छातीठोकपणे सांगतो, की तुमच्या भूमिकेमुळे आमच्या गावावर काहीही फरक पडणार नाही. निवडणुकीत कुणाचा काय करायचा हे आम्ही गावकरीच ठरवू....

पण मी काय म्हणते रोहित राजे तुम्हाला भूमिका खूप आवडते का...आजकाल ती सिनेमात फार दिसत नाही. नेहा नटवेंनी प्रश्न विचारला तसे सर्वच हसायला लागले. सर्व हसत असतानाच सत्या पुन्हा बोलता झाला.

सत्या कडवटे- नेहा, भूमिका म्हणजे सिनेमात काम करते ती भूमिका चावला नव्हे.

सत्या बोलताच नेहा नटवेंना आपला ओठ चावला.

बरं. बरं म्हणत तिने बूमच बंद केला. इतक्यात रोहित राजे बोलते झाले.

रोहित राजे – हे बघा कडवटे, तुम्ही कितीही कडवट बोललात तरी परिस्थितीनुसार आम्ही आमची भूमिका बदलणार म्हणजे बदलणार, अहो वेळेनुसार जो भूमिका बदलतो तोच भविष्यात टिकतो. आमची भूमिका बदलली तरी आवाज घुमतो. माझी गावात सभा होते तेव्हा आवाज कुणाचा असा कुणी प्रश्न विचारत नाही. त्या त्या वेळी जे योग्य होते तेच आम्ही केले आणि यापुढे करत राहणार....रोहित राजेंनी एका दमात सांगून टाकलं

रोहित राजेंना थांबवत आदित्य विचारेंनी पुन्हा तोंड उघडलं.

आदित्य विचारे – तुम्ही पक्ष बदलता, भूमिका बदलता. त्यामुळे तुमच्यावर काही फरक पडत नाही मात्र गावावर फरक पडत आहे. गावात तुमच्या पाठिंब्याच्या भूमिकेवर कुजबुज कुजबुज सुरू झाली  आहे. जो तो तुमच्या नावाने खडे फोडत आहे. रोहित राजेंना नेमकं काय झालं हे दबक्या आवाजात विचारत आहे.

इतक्या पुन्हा नेहा नटवे बोललीच

नेहा नटवे – विचारे तुम्ही रोहित राजेंचा कशाला विचार करता. त्यांचीच भूमिका आणि त्यांचाच धूर....

तू जरा शब्दांचा धूर सोडू नको, हवा येऊ दे, असं म्हणत सत्याने बोलायला सुरुवात केली.

सत्या कडवटे - आदित्य विचारे, या रोहित राजेंचा काहीही नेम नाही. गावाचा केव्हा गेम करतील हे सांगता येत नाही. आमच्या गावाचा विकास बाकी आहे, वाडी भकास झाली आहे. विहिरींनी तळ गाठलाय, थेंबभर पाण्यासाठी तांब्याभर घाम गालावा लागतोय. शाळा बंद होत आहेत. अशिक्षितांचा मोठा लोंढा तयार होतो आहे. पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवावा हाच प्रश्न आवाचून उभा असेल तर कोणत्या पक्षाला कोणत्या मुद्द्यावर मतदान करायचे हा विचारच डोक्यात येत नाही. कारण विचार पोटाचा आहे, दोन वेळच्या घासाचा आहे. मग हातावर जे पडेल आणि जो पाडेल ते घ्यायचे हाच विचार डोक्यात येतो. जनतेची क्षणाची सोय होते आणि नेत्यांची अनंत काळासाठी सुविधा होते. मतदान झाल्यावर एकदा का नेत्यांनी पाठ फिरवली की पाठिंबा कुणी  दिला, पाठिंबा कुणाला दिला, पाठिंबा कशासाठी दिला हे पाठीराखे विचारत नाहीत, मग जनता तरी कशाला विचारेल?...या नेहा नटवेंसारखे पत्रकार जनता लक्षात ठेवील असे बोंबलत बसतात, मात्र बरेच लोक या गोष्टी विसरतात, या शॉर्ट टर्म मेमरीचाच फायदा घेतला जातो. सत्याचा आवाज वाढला होता. पिंपळपारावरचं वातावरण थोडे गंभीर झाले होते. सत्याचा आवेश पाहून आदित्य विचारे बोलू लागले

आदित्य विचारे – अरे सत्या शांत घे. तू म्हणतोस त्यात सत्य आहेच. साध्याभोळ्या आपल्या गावातल्या जनतेचा फायदा घेतलाच जातो. मत दिल्यानंतर ते कुणाला जाणार, यावर खलबतं होतात. रोहित राजेंसारखे राजकारणी कोट्यवधी ओततात आणि अब्जावधी कमवतात. सर्वसामान्यांच्या झोपडीत मात्र 40 होल्टचा दिवाच पेटलेला असतो. निवडणुका आल्या की आरोप-प्रत्यारोपांचे रणगाडे सुरू होतात. कार्यकर्त्यांची धावपळ होते. पदाधिकारी भरडले जातात आणि जनता चिरडली जाते. त्या जनतेकडे पाहायला कुणाला वेळ नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर उभं राहून पाठिंबा देण्याची कुणाला हिंमत होत नाही. बंद होत असलेल्या शाळांविरोधात लढणाऱ्यांना पाठिंबा देण्याची कुणाला आठवण होत नाही. प्रत्येकाची चूल पेटली पाहिजे म्हणून त्यांच्या बाजूने कुणी पाठिंबा जाहीर करत नाही. कोरड्या विकासाचा भात आणि कोरड्या विकासाची डाळ. आदित्य विचारेंनी सामाजिक दृष्टिकोनातून भूमिका मांडली. आदित्य विचारेंच्या भूमिकेमुळे पारावर काही काळ शांतता पसरली होती.

ही सर्व चर्चा सुरू असताना आतापर्यंत शांत बसलेले सदा सामान्ये बोलेत झाले. पाठिंबा आणि पलटी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, धूर मात्र जनतेचा निघतो.”

banner

Post a Comment

0 Comments