जिंकणार तर पवारच ना...
#sharadpawar #ajitpawar #supriyasule #sunetrapawar #baramati loksabha
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जी रणनीती आखली जातेय त्याचा थांगपत्ता लागयलाच वेळ लागतोय. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात होणारी ही निवडणूक लक्षात राहील ती उमेदवार निवडीवरून. उमेदवारांचे रुसवे-फुगवे सांभाळताना त्या त्या पक्षप्रमुखांच्या नाकीनऊ यायला लागले. त्यातच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या घराविरोधात घर अशा आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत ही नणंद विरुद्ध भावजय अशी रंगणार आहेत. त्यात कोण बाजी मारेल हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल, मात्र 'कट्टाबिट्टा'वर वेगळीच चर्चा रंगली होती.
पिंपळपारावर 'कट्टाबिट्टा' रंगला तो राजकीय नेते रोहित राजे, सामाजिक कार्यकर्ते आदित्य विचारे, नेहमी सत्य आणि कटवट बोलणारा सत्या कडवटे, नटूनथटून येणारी पत्रकार नेहा नटवे आणि नेहमीच सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारे सदा सामान्ये.
आदित्य विचारे - अहो रोहित राजे, काय चाललंय काय तुमच्या राज्यात अर्थात राजकारणात? विचार करून करून डोकं गरगरायला लागलंय आमचं...
रोहित राजे - अहो गरगरणार नाही तर काय? कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल आणि कोणता पक्षाचा म्हणतात तो पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेईल हे शपथेवरही सांगता येत नाही. रोहित राजे यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच पत्रकार नेहा नटवेने बूम पुढे केला.
नेहा नटवे - म्हणजे या बोटावरची थुंकी सुकायच्या आत दुसऱ्या बोटावर दिसते, असंच म्हणायचंय ना रोहित राजे तुम्हाला?
आदित्य विचारे - तू थांब आधी... तुम्हा पत्रकारांना सुतावरून स्वर्ग गाठायची लय सवय लागली.सकाळी सांगितलेली बातमी दुपारी बदलता आणि दुपारी लावलेली बातमी संध्याकाळी बदलता...हे सर्व बोटावरच्या थुंकीसारखंच आहे. तेव्हा तू जरा धीर धर. आदित्य विचारेंनी नेहा नटवेला मधेच थांवबलं तस नेहा नटवे नाक मुरडत बोलायची थांबली.
रोहित राजे - नाही तर काय? तुम्ही लोक कुणाचा संबंध कुणाची जोडाला आणि कोणता अँगल कुणाला लावाल आणि कळ काढाल हे कलीलाही कळायचं नाही. रोहित राजे पुन्हा बोलते झाले.
सत्या कडवटे - तुम्ही इथे महाराष्ट्राच्या हिताचं बोलायला आलात ना, मग त्यावर बोला. मी काय म्हणतो, या सर्व राजकारण्यांना रिटायर्ड करून नवीनच पक्ष उभा करायला हवा. सत्याने जोमाने आपले विचार मांडले.
रोहित राजे - अहो इथे आहेत तेच पक्ष महाराष्ट्राला सांभाळता येत नाहीत आणि या पक्षांना महाराष्ट्र सांभाळता येत नाही. काय झाले आहे, आम्ही सर्व काही बदलत आहोत. म्हणजे विचारधारा, रणनीती वगैरे वगैरे...
आदित्य विचारे - तुम्ही कसलं काय बदलता आहात. नुसती नेत्यांची देवाणघेवाण सुरू आहे...
नेहा नटवे - बरोबर विचारेसाहेब. आमच्या भाषेत त्याला इन्कमिंग आणि आऊटगोईंग म्हणतात...
सत्या कडवटे - इन्कमिंग आणि आऊटगोईंगमुळेच सगळी रसमिसळ झालीय या राजकारणाची. अरे मिसळमध्ये तरी कमी पदार्थ मिसळत असतील, पण आज राजकीय पक्षांमध्ये किती पक्षांचे किती नेते आहेत, किती आले आणि किती गेले आणि त्यांची कशी भेसळ झाली हेच कळत नाही. भ्रष्टाचारी कोण आणि शिष्टाचारी कोण, याचा पत्ताच लागत नाही. सत्याने नेहा नटवेला थांबवत आपलं म्हणणं मांडलं.
रोहित राजे - राजकारण आहे ते. होतच राहणार. या फोडाफोडीमुळे घराघरातील माणसं एकमेकांविरोधात निवडणुकीत उभी राहिली आहेत. कुठे भाऊ विरोधात भाऊ, कुठे काका विरोधात पुतण्या, कुठे बहीण विरोधात भाऊ आणि कुठे नणंद विरोधात भावजय.
नेहा नटवे - यालाच तर रंगतदार लढती म्हणतात. नणंद बाजी मारणार की भावजय जिंकणार ? भावजय विरुद्ध नणंद लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात, अमूक गड कोण राखणार? तमूक गड कोण राखणार, याचा नुसता धुरळा उडालाय.
आदित्य विचारे- नटवे मॅडम, तुम्हाला हे सर्व नटूनथटून सांगायला मजा येत असेल ना...नुसती आरडाओरड. बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद विरुद्ध भावजय यांच्यात जो काही सामना रंगणार आहे त्याला तोडच नाही. आता हेच बघा ना. एका पक्षाचे दोन पक्ष झाले. चिन्हं बदलली. लक्षात कुणी मतदारांनी ठेवायचं.निष्ठा कार्यकर्त्यांनी जपायची. आदित्य विचारेंनी भूमिका मांडली.
सत्या कडवटे - आजचं हे राजकारण सत्ता हातात ठेवण्यासाठी आहे, विकास हा लोणच्यासारखा होऊ लागलाय. जनतेसमोर भाषणं ठोकताना लोणच्या फोडीसारखा एकाद्या विकासकामाचा उल्लेख करायचा. तेच नेते, तीच घराणी, तेच विचार आणि तेच सर्वकाही. सत्याने मर्मावर बोट ठेवलं.
इतक्यात नेहा नटवेनं पुन्हा तोंड घातलंच.
नेहा नटवे - पण मी काय म्हणते मुद्दा बारामतीच्या नणंद-भावजयीचा होता ना. मग चर्चेचा अँगल बदललात काय?
रोहित राजे - या नटवेचा आदी बूम बंद करा. लयच बकबक करतेय.
सत्या कडवटे - या राजकीय पक्षांची टीका करण्याची पातळी एवढी घसरलीय की 'पातळी' शब्दसुद्धा ढसाढसा राडायला लागलाय. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही पवारांची प्रतिष्ठा म्हणे पणाला लागलीय. बारामतीकरांनी आतापर्यंत लेकीला निवडून दिले आता सुनेला निवडून द्या. पवार आडनाव असेल तिथे मतदान करा, असे म्हणे दादांनी आवाहन केलंय. मग काय थोरले पवार गप्प कसे बसतील. त्यांनीही म्हणे उत्तर देऊन टाकले. बारामतीकरांना पवार आडनावाच्या मागे उभं राहायला हवं, त्यात चूक काय? मात्र त्याच वेळी त्यांनी एक 'मूळ पवार' आणि दुसरे 'बाहेरून आलेले पवार' असं म्हटलं म्हणे.
त्यात काय झालं? सत्याला थांबवत आदित्य विचारे बोलू लागले. निवडणुका आहेत, जागा जिंकायची आहे तर टीका तर होणारच ना.
सत्या कडवटे - टीका होणार. हल्लाबोल होणार. सर्व काही होणार. पण त्यांच्या या टीकेने सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणे. पाणावलेले डोळे पुसत पुसत त्या निघून गेल्या. याची आता चर्चा रंगू लागली.
पिंपळपारावर ही चर्चा सुरूच होती. या चर्चेत आतापर्यंत सदा सामान्ये एकही शब्द बोलले नव्हते. शेवटी ते बोलते झाले.
सदा सामान्ये - कुणी कुणावर टीका करो, उणीधुणी काढो. नातेबंधांवरू टोमणे मारणे. नणंदेला जास्त मतं पडोत की भावजयीला जास्त मतं पडोत. सुप्रिया ताई जिंकोत की सुनेत्राताई जिंकोत. कुणाचा तरी विजय आणि कुणाचा तरी पराभव होणार हे पवारांना माहीतच आहे. निवडणुकीनंतर लेखाजोखा होईलच. एवढं मात्र खरं आहे, मतदारांनी कुणालाही मतं दिली तरी जिंकणार 'पवार कुटुंबीयच ना'....
0 Comments